Ad will apear here
Next
औषधशास्त्र सांगते...

औषधे हा अलीकडे आपल्या दैनंदिन जगण्यातला एक आवश्यक घटक बनला आहे. खरे तर बरेच जण तब्येतीच्या कोणत्याही छोट्या-मोठ्या तक्रारीसाठी हमखास औषध घेताना दिसतात. परंतु तब्येतीच्या छोट्या-छोट्या तक्रारींवर, आपण रोज घेत असलेला आहार हेच एक उत्तम औषध आहे. आपला दैनंदिन आहार, शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची पूर्तता करत असेल, तर तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपल्याला औषधांची गरज भासणार नाही. कारण आपला आहार, अन्न हेच औषधांपासून दूर राहण्याचे एक गमक आहे... ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या औषधांच्या महत्त्वाबद्दल...
..........
तब्येतीच्या छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी सतत औषधे घेण्यापेक्षा रोजचा आहार उत्तम असेल, तर औषधांची गरज पडत नाही. रोजच्या जीवनात उत्तम आहार, योग्य विश्रांती घेणे, व्यायाम करणे, ताणतणावापासून दूर राहणे इत्यादींमुळे आपले आरोग्य उत्तम राहते; पण तरीही काही असाध्य आजार, उदा. कर्करोग किंवा काही आनुवंशिक आजार असतील, तर औषधांशिवाय पर्याय नसतो. अशा जीवघेण्या आजारात औषधेच आपल्याला साथ देताना दिसतात.

औषधशास्त्र आज अत्यंत प्रगत झालेले आहे. दररोज अनेक नवनवीन रोग डोके वर काढत आहेत. एका शास्त्रज्ञाने म्हणूनच ठेवले आहे, की ‘नथिंग इज मोअर इंटरनॅशनल दॅन डिसीजेस..’ आणि हे खरेसुद्धा आहे. काही रोगांनी (उदा. डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू) अख्ख्या भारतात हाहाकार माजवला. ‘झिका’सारखा विषाणूजन्य रोग इतर देशांत थैमान घालताना दिसतो आहे. काही काटेकोर बंधने पाळल्यामुळे हा रोग अद्याप आपल्याकडे पोहोचलेला नाही. औषधशास्त्र म्हणजे आरोग्यशास्त्र व रसायनशास्त्राचा उत्तम मिलाफ आहे. 

फार्मास्युटिकल कंपन्यांच्या औषधांचा वापर एखाद्या रोगाचे निदान होण्याकरिता, तो बरा करण्याकरिता किंवा रोग होऊ नये यासाठी केला जातो. या विषयाची व्याप्ती प्रचंड आहे. औषधांचे जवळपास वीस प्रकार आहेत; पण हे वर्गीकरण अनेक प्रकारांनी होऊ शकते. उदा. शरीरातील वेगवेगळ्या संस्थांप्रमाणे दिली जाणारी औषधे किंवा नैसर्गिक औषधे. रासायनिक किंवा अकार्बनी मूळ असलेल्या पदार्थांपासून बनविलेली औषधे असल्यास तसे वर्गीकरण होऊ शकते. 

सध्या सगळीकडे ‘हर्बल’ औषधांचा बोलबाला आहे. आपण असे समजतो, की ‘हर्बल’ असे लिहिलेले प्रत्येक औषध फक्त वनस्पतीपासूनच बनवलेले असते; पण खरे तर असे नसते. सकाळी उठल्यावर दात घासण्यासाठी आपण वापरत असलेल्या टूथपेस्टपासून ते रात्री झोपताना डास चावू नयेत म्हणून अंगाला लावल्या जाणाऱ्या क्रीमवरील हर्बल या शब्दाने आपली फसगत होऊ शकते. वजन कमी होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी आपण निरनिराळ्या पावडर व औषधे सर्रास वापरतो; पण त्यात कोणते घटक आहेत याचा फारसा कोणी विचार करत नाही.  

आहारशास्त्रात या औषधांचा उपयोग आहेच; पण वेगवेगळी टॉनिक,  इलेक्ट्रोलाइट, लोह किंवा इतर खनिजांच्या गोळ्या, जीवनसत्त्व किंवा इतर अन्नघटकांची औषधे, दुधात घालून घेण्यासाठीच्या प्रथिनांच्या पावडर, बिस्किटे इत्यादी औषधे वरदान ठरतात. आपल्यावर एखादी महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया झाली असेल, तर काही वेळा एखाद्या जीवनसत्त्वाचीच गरज असते. जसे ‘न्यूरोबियॉन’ हे ‘बी’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी आवश्यक असते. त्याची कमतरता असल्यास डोळा लवणे, तो जड वाटणे इत्यादी त्रास सुरू होतो; पण त्या जीवनसत्त्वाची गोळी सुरू केल्यास हा त्रास त्वरित थांबतो. म्हणजे औषधशास्त्र शरीराला आवश्यक असणाऱ्या सूक्ष्मात सूक्ष्म अशा शरीराला आवश्यक पोषणमूल्यांचा विचार करते. 

सर्व घरांमध्ये सकाळी दुधात घालण्यासाठी वेगवेगळ्या पावडरचा वापर होतो. अशा पावडरचा प्रचार करण्यासाठी अतिशय आकर्षक जाहिराती असतात व त्या जाहिरातींना भुलून आपण त्या पावडर वापरतो. आता आपण स्वतःलाच प्रश्न विचारावा, की या पावडरमध्ये कोणते साहित्य वापरले आहे, हे आपण कधी वाचले आहे का? त्याचा खरेच किती फायदा होतो, हे बघायला हवे. आज वजन कमी करण्यासाठी अनेक पावडर व औषधे उपलब्ध आहेत; पण यातील घटकांबद्दल आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांशी चर्चा केल्याशिवाय व त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय त्याचा वापर करू नये. अनेक वेळा चाळिशी ओलांडलेल्या स्त्रिया आपल्या मनानेच कॅल्शियम किंवा लोहाच्या गोळ्या सुरू करतात; पण अनेक कंपन्या कॅल्शियम अनेक औषधांमध्ये अनेक प्रकारे वापरतात. यापैकी काही गोळ्यांमध्ये कॅल्शियमसोबतच इतर जीवनसत्त्वे,  तर काही गोळ्यांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व असते; पण बऱ्याचदा त्यात डी थ्री, डी सिक्स असेही प्रकार असतात. आपल्याला खरेच कशाची गरज आहे, याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. 
 
औषधशास्त्राने निर्माण केलेली विविध औषधे हे वरदानच आहे यात शंकाच नाही; पण त्यांचा उपयोग करताना त्यांच्या मर्यादा व त्यासाठी मार्गदर्शन याचा विचार होणे गरजेचे असते. प्रथिनांच्या पावडरचा चुकीचा वापर केल्यास त्याचा थेट यकृत किंवा मूत्रपिंडाशी संबंध येतो. वजन कमी करण्याच्या पावडर चुकीच्या पद्धतीने घेतल्या गेल्यास पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. केसांचे तेल वापरताना त्यावर ‘फॅट सोल्युबल’ असे लिहिलेले असते; पण केसांना आवश्यक असलेली सर्व घटकद्रव्ये त्यात असल्याची खात्री केल्यास आपलाच फायदा होणार आहे. अनेक वेळा डॉक्टर सल्ला देतात, त्याचे आपण काटेकोर पालन करत नाही. गोळ्या जेवणापूर्वी, जेवणानंतर, दिवसातून एकदा, अशा सूचना दिल्यानंतरसुद्धा त्यांचा परिणाम लवकर होण्यासाठी आपण आपल्या मनाने औषधे घेऊन गोंधळ घालतो आणि मग त्यांचा हवा तसा परिणाम होत नाही; मात्र आपण त्याचे खापर औषधांवर फोडून मोकळे होतो, हे योग्य नाही. त्यामुळे औषधांचा वापर किती, केव्हा, कोणी व कशासाठी करायचा हे तज्ज्ञांवर सोडा व त्यांना ठरवू द्या. औषध घेण्याचे नियम काटेकोरपणे सांभाळल्यासच त्यांचा गुण आपल्याला येईल व औषधशास्त्र हे वरदान ठरेल. 

- आश्लेषा भागवत
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVMBO
Similar Posts
या बियांमध्ये दडलंय काय? काही भाज्या व फळे जसे वांगी, दुधी भोपळा, पेरू यांच्या बियाही आपण सरसकट खातो, पण लाल भोपळा, टरबूज, कलिंगड, संत्र, लिंबू यातील बिया मात्र फेकल्याच जातात. खरे तर इथेच आपण मोठी चूक करतो.... ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या फळे आणि भाज्या यांमधील बियांचे महत्त्व...
संकल्पना नैसर्गिक आहाराची... आजकाल शाळांमध्ये अगदी छोट्या मुलांना ‘अग्नीशिवाय स्वयंपाक’ अशी एक संकल्पना सांगितली जाते. यामुळे मुले अतिशय आनंदाने वेगवेगळे पदार्थ बनवतात व त्याचा आनंदही घेतात. तसेच काहीतरी आपण मोठेही करू शकतो. आठवड्यातून एक दिवस फक्त नैसर्गिक अन्नपदार्थच खायचे... ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या महत्त्वपूर्ण नैसर्गिक आहाराबद्दल
डाएट म्हणजे नेमके काय? ‘डाएट’चे फॅड सांभाळताना आजकाल स्वतःवर मनानेच विविध प्रयोग केले जातात. असे करण्याने वजन कमी होत नाहीच, उलटपक्षी चुकीचे काहीतरी खाल्ल्याने तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. खरे तर प्रत्येकाच्या आहारात काही गोष्टी समान असल्या, तरी उंची, कामाचे स्वरूप, व्यायामाची सवय, आजार किंवा व्याधी इत्यादी सर्व
डोळ्यांच्या आंतरिक सौंदर्यासाठी... समतोल आहार ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. तो घेतला, तर रक्तदाब, स्थूलपणा, हृदयरोग व मधुमेह अशा मोठ्या आजारांपासून आपण लांब राहू शकतो. मधुमेह झाला नाही, तर डोळ्यांच्या तक्रारी फारशा वाढत नाहीत. डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक व महत्त्वाची पोषणमूल्ये कोणती आहेत, हे खरे तर किती जणांना ठाऊक असते..? ‘पोषणमंत्र’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language